मुदाई मंदिर २५० ते ३०० वर्ष जुनं आहे. ते वर्षातले ८ ते १० महिने पाण्यामध्येच असते फक्त काही काळ उन्हाळ्यात ते पाण्याच्या बाहेर असते. त्याच वेळी भाविक या मंदिरात दर्शन घेऊ शकतात. मंदिर पुरातन असून त्याचा पुरावा देऊ शकत नाही पण त्याच्या एकूणच बांधकामाच्या शैली वरून मंदिर २५० ते ३०० वर्ष जुनं असावे असे लक्षात येते.

मंदिराच्या घुमटाचे बांधकाम चुन्यामध्ये केलेले आहे. पूर्वीच्या बांधकामामध्ये स्लॅब तयार करणे असा काही प्रकार नव्हता, जसे आपण मडकं घडवतो, प्रथम हळू हळू मडक्याचा वर्तुळाकार आकार बनतो व नंतर मडक्याचा वरचा डेरा घडवतो तसा हळू हळू मंदिराचा गोलाकार घुमट तयार केला गेला असावा आणि नंतर त्यावर शिखर चढवलं गेले असावे.

तसेच मंदिराच्या बांधकामामध्ये वापरलेल्या विटा आत्ताच्या जशा ४ * ६ असता तशा नाहीत त्या चपट्या साधारण दीड किंवा दोन इंच रुंदी आणि चार ते पाच इंच लांबी अश्या असाव्यात. पाण्याच्या हपक्य ( पाण्याचा मारा ) मुळे विटेला आधार देणारा चुना निघत चाललेला आहे. त्या विटांमधील चिरा सिमेंटने भरण्याचा प्रयत्न आत्ताच्या पिढीने केला आहे पण जी मंदिराची जी जुनी रचना आहे तिला धक्का नाही लावला. या सुधारणेमध्ये सिमेंटचा वापर करून विटांमधील चिरा भरणे आणि छताचे झालेले नुकसान यांचा समावेश आहे.

तांदळा म्हणजे पूर्वीच्या काळी वीणेच्या आकाराचा दगड उभा करून त्याची प्राणप्रतिष्ठा केली जायची. देवीची मूर्ती हि याच तांदळा प्रकारची आहे. याच तांदळाच्या मूर्तीला जवळ जवळ २५० वर्ष झाले असतील तरीही तो आज चांगल्या स्थितीत उभी आहे. या तांदळाच्या मूर्तीने आत्ता पर्यंत जवळ जवळ २५० वर्ष नीरा नदीच्या पाण्याचा मारा सहन केला आहे.

मंदिराला सभामंडप ही होता हे आत्ताच समजले, ते यावरून की मंदिराच्या समोरील बाजूस स्टीलचा म्हणजेच लोखंडी गजांच्या वापर केल्याचे पुरावे दिसून आलेत, अगदी अलीकडच्या काळात स्टीलचा वापर करून सभामंडप बांधण्यात आला असावा असे वाटते पण तोही आत्ता पडून गेलेला आहे. मंदिरासमोर एक दिपमाळ आहे, तिच्या रचनेवरून ती ही मंदिरा इतकीच जुनी वाटते.

बरोबर मंदिराच्या खालच्या बाजूला नदी वाहते, तिथे बांधीव घाट होता जसा कृष्णेला आहे तसा. असा उल्लेख पूर्वीची माणसे करत होती. पूर्वी नीरा नदीचे पात्र छोटं होत त्यामुळे तो घाट पूर्णपणे दिसायचा पण आत्ता पात्र इतकं मोठा झालं की कमीत कमी त्यावर १५ ते २० फूट गाळ साचला असेल. तो घाट शोधला तर सापडू शकतो. पण तो अचूक कोणत्या जागी आहे ते माहित नसल्यामुळे ते खूप अवघड आणि खर्चाचे होऊ शकते.

पूर्वी असे बोलले जायचे की मुदाईच्या जत्रे आधी एक दोन दिवस जत्रेला लागणाऱ्या वस्तू नदीतून वरती येत असत आणि जत्रा झाल्यानंतर त्या तश्याच पाण्यात सोडून दिल्या जायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्या गायब होत असत. शेवटी एका माणसाने त्या वस्तूपैकी एक वस्तू चोरली त्याचा उद्देश काय होता हे माहित नाही पण त्या दिवसापासून त्या वस्तू प्रकट होणे बंद झाले. आज तागायत आम्ही असे काही पाहिले नाही पण कोणाला माहित खरे आहे की गैरसमज.

पुरातन मुदाई देवी मंदिर वर्षातले ८ ते १० महिने पाण्यामध्येच असल्यामुळे भाविकांच्या सोयी साठी नवीन मंदिर बांधायचे काम चालू आहे ते जवळ जवळ संपतच आले आहे. हे मंदिर पूर्णपणे भोई समाजाचे तारू कुटुंबच बांधत आहेत. मंदिराच्या पायाभरणीमध्ये सर्व तरू कुटुंबीयांनी आर्थिक मदत केली आहे.

मुदाई देवी हे तारू कुटुंबाचे कुलदैवत आहे. तारू म्हणजे पालखीचे भोई. तारू हे नाव कसे मिळाले याचाही इतिहास आहे. जेव्हा शिवाजी महाराजांच्या मागे गनीम म्हणजे शत्रू लागले तेव्हा शिवाजी महाराजांना नदीच्या पलीकडे सुखरूप पोहचवणे गरजेचे होते. भोई हे पालखी वाहणारे असा उल्लेख पुराणांमध्ये आणि इतिहासात सर्वत्र आढळतो. तर भोई पथकांपैकी चार भोई शिवाजींना महाराजांना पोहत पोहत नदी पार करतील आणि बाकी गनीमांना थोपवून धरतील अशी योजना होती. शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून काही मावळ्यांसोबत नदी पार केली. पाठीमागे जे राहिले होते ते गनिमांच्या तावडीत सापडले आणि त्यांनी त्यांचे शीर उडवून टाकली. तेव्हा महाराजांनी सांगीतले की त्यांचे जे वंशज आहेत त्यांचं आडनाव शिर्के होईल आणि ज्यांनी आम्हाला तारून न्हेलं आहे त्यांचं आडनाव तारू राहील हा इतिहास श्री बाबासाहेब पुरंदरे यांनी श्री नंदकुमार तारू यांना शिरवळ मध्ये असताना सांगितला.

फोटो संग्रह