शिरवळचे भैरवनाथाचे मंदिर गावाच्या पूर्वेला आहे. या मंदिराला जाताना वाटेत उजव्या हाताला निगडे देशमुखांचा ऐतिहासिक वाडा आहे. भैरवनाथाच्या मंदिराचे पश्चिमाभिमुख महाद्वार लागते. ते चांगलेच उंच आणि भव्य आहे. या महाद्वाराच्या कमानीची एक वेगळीच धाटणी आहे. या मंदिराभोवती दगडी तट आहे. या दारातून गेल्यावर काही पायऱ्या उतरून आपण प्रकारांत येतो. एक विशेष बाब म्हणजे या भैरवनाथाचे तोंड दक्षिणेला आहे. चारी बाजूनी दगडी तट आणि उत्तरेच्या अंगाला मुख्य मंदिर आहे. मंदिर बरेच जुने, यादवकालीन असावे. सभामंडप, अंतराळ आणि नंतर देवाचा गाभारा असा सर्वसाधारण क्रम असतो. इथे तसा तो बघायला भेटत नाही. पडवीवजा जागेतून एकदम देवापाशी जाता येते. प्राकारात कधीकाळी सोपेवजा इमारती असाव्यात असे तेथील अवशेषांवरून वाटते.
भैरवनाथ म्हणजे कालभैरव. याला गावाचा रक्षण करता म्हणून आळखले जाते. साधारण चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून गावामध्ये उत्सव सुरु होतो. त्यांना यात्रा असेही म्हणतात. यात्रेच्या ठिकाणी मुख्य देवतेचे दर्शन घेतल्यावर कालभैरवाचे दर्शन घायचे असते अशी प्रथा आहे. याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही.हि प्रथा गावामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.
या दिवसात कुस्त्यांचे फड, तमाशे, देवाचा छबिना इत्यादी गोष्टी साजऱ्या होतात. शिवाय मराठी शाळेच्या मैदानामध्ये विविध प्रकारचे पाळणे लागतात. यात्रे मध्ये लहान मुलांना हे मुख्य आकर्षण असते. या यात्रेसाठी बाहेर गावातील पाहुण्याना बोलावले जाते.