
श्रीकेदारेश्वराचें भव्य आणि सुंदर मंदिर शिरवळ गावाच्या पश्चिमेला एका ओढ्याच्या काठावर आहे. हे मंदिर प्रशस्त आणि उत्तम घडीव दगडी कोट (तट) आहे. ताटाची उंची सुमारे अठरा फूट आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून महाद्वाराचे बांधकाम रेखीव ,सुबक आणि मजबूत आहे. प्रवेशद्वाराचे कमान सात पाकळ्यांची,थोडी उभट ,उंच आहे. ती दोन सुबक स्तंभावर आधारलेली आणि अगदी प्रमाणबद्ध आहे. देवळात प्रवेश केला कि दोन्ही बाजूंना देवड्या आहेत. या देवड्यांवर पूर्वी नगारखाना असावा. एका वृद्ध गृहस्थाने सांगितले कि “इथे नगारा वाजला कि तोफ वीरगावापर्यंत ऐकायला जात असे. वीरगाव तस बरेच लांब आहे. या नगारखान्याच्या खाली आणि प्रवेशद्वाराच्या आणि देवडीच्या वर देवासन्मुख एक श्री गजाननाचे शिल्प आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना ऋद्धी सिद्धी असून ते भग्नावस्थेत आहे. गणपतीचे असे महाद्वारात व देवसन्मुख शिल्प महाराष्ट्रात अन्यत्र कुठे दिसत नाही.
महाद्वाराच्या आत प्राकारात सुरवातीलाच देवाकडे तोंड करून नंदी एका उंच चौथऱ्यावर बांधलेल्या छोटेखानी मंदिरात बसलेला आहे. त्याला नंदिकेश्वर असे संबोधलेले आहे. नंदीच्या चारही बाजुंनी कमानी असून वर उंच घुमट आहे.नंदीच्या उजव्या हाताला दक्षिण कोपऱ्यात सुबक अशी दीपमाळ आहे. हि दीपमाळ अष्टकोनी घडीव दगडांची आहे. पण दीपमाळसमोर प्राकारात दोन छोटी गणपती आणि विठ्ठलाची देवळे आहेत. नंदिकेश्वराच्या समोरच्या उंच चौथऱ्यावर श्रीकेदारेश्वराचे मुख्य मंदिर आहे.
पहिला सभामंडप एकूण सोळा दगडी खांबावर उभारलेला आहे. या सभामंडपावर पूर्वी दोनदा वीज पडली आणि त्यामुळे बरेच नुकसान झाले. हे जुने बांधकाम मुळातच मजबूत असल्याने विजेचे दोन तडाखे त्याने सहन केले. या सभामंडपानंतर एका नेटक्या प्रवेशद्वाराने आपण मधल्या गाभाऱ्यात प्रवेश करतो. सुमारे ४० फूट लांब आणि ३० फूट रुंदीचा हा गाभारा पाच पाच खांबाच्या ओळींवर उभा आहे देवाच्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वार येथेच आहे. डोक्यावर गणेशपट्टी आहे. देवाचा गाभारा खाली खोल आहे. श्रीमुख पूर्वेला आणि सोमसुत्र उत्तरेला आहे. देवळाच्या शिखराची जमिनीपासून उंची सुमारे ४५-५० फूट असावी.
शिखरावर नाना प्रकारच्या देवदेवतांच्या मूर्ती असून त्या आजही सुस्थितीत आहेत प्राकाराच्या आतून मंदिराला प्रदक्षिणा घातली तर प्रकाराचा विस्तार जास्त लक्षात येतो.केदारेश्वरासमोर जी पुष्करणी आहे ती इतिहासात “केदारबाव” या नावाने प्रसिद्ध आहे. ती चांगल्या घडीव दगडांनी बांधलेली आहे. पाण्यापर्यंत जाण्यासाठी सुबक तेरा पायऱ्या आहेत. याशिवाय महाद्वारापासून जवळच पाण्यापर्यंत जाणारा आणखी एक मार्ग आहे. उत्तरेकडून या पायऱ्या आहेत आणि पाण्यापाशी पोहचताना आपले तोंड पूर्वेला होते. केदारबाव आयताकृति कुंडाच्या आयताची आहे. निगडे देशमुखांचे केदारेश्वर हे कुलदैवत आहे.
फोटो संग्रह
Source:-
- vicharmanthan shirwal-pride facebook page
- Information: Subhanmangal Book
- More help- Akshay Khairnar
Note: Following information totally refer from Subhanmangal Book all credit goes to book writer