श्रीरामेश्वराचे मंदिर गावाच्या पश्चिमेला नीरा नदीच्या काठावर आहे. हा भाग वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातलाच आहे. मंदिर नदीच्या पात्रापासून जरा दूर व उंच जागेवर असल्याने पाण्यात बुडत नाही इतकेच . त्याच्या समोरच थोड्या अंतरावर जवळ जवळ नदीच्या पात्रात गर्गेश्वराचें मंदिर आहे. पण आता ते पाण्यात बुडालेले आहे.
रामेश्वराचे मंदिर हेमाडपंती आणि कमानी असलेले मोठे टुमदार आहे. आजूबाजूला बागबगीचा केला आहे. पाणी नसेल तेव्हा मोकळ्या हवेत फिरण्यासाठी अगदी उत्तम असे हे स्थान आहे. रामेश्वराच्या देवळापासून निरेचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. पावसाळ्यात पात्रात पाणी अमाप असते आणि सारा प्रदेश एखाद्या प्रचंड खाडीसारखा दिसतो. रामेश्वरापासून सूर्योदय अतिशय छान दिसतो. पूर्वेला शुभानमंगळचे अवशेष दिसतात जवळच गावाचे स्मशान भूमी आहे.