पूर्वीच्या शिव मंदिराची खासियत अशी असती कि ते गावाच्या बाहेर सीमे जवळ किंवा नदी शेजारी असते. असेच पुरातन शिव मंदिर खंडाळा येथे आहे. आत्ता या मंदिराचा पूर्णपणे जीर्णोद्धार केला गेला आहे. पुरातन मंदिराची पारंपरिक शैली पूर्णपणे बदलून त्याजागी सिमेंटचा वापर करून नवीन मंदिराची निर्मिती केली आहे. पूर्वीचे मंदिर हेमाडपंती होते. मंदिरामध्ये असलेली शंकांची पिंड आणि नंदी गावकऱ्यांनी जतन करण्यासाठी सातारा येथील पुरातात्विक कॉलेजला देण्यात आले आहे.

याच शिवमंदिराशेजारी सुमारे ६०० वर्षांपूर्वीच्या विरगळी सापडल्या. या विरगळी जमिनीखाली गाडल्या गेलेल्या होत्या. इतिहासप्रेमी आणि तरुणांनी पुढाकार घेऊन त्या विरगळींचे उत्खनन करून त्या सुरक्षित भैरवनाथ मंदिराशेजारी ठेवल्या. या विरगळी पूर्णपणे अखंड दगडामध्ये कोरलेल्या आहेत. या विरगळी मध्ये चार वेगवेगळ्या प्रसंगाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. विरगळींचा अर्थ समजण्यासाठी त्याचे वाचन उलट्या क्रमाने करावे लागते.

  • तर सर्वात खालच्या रकान्यात एक व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत दाखवलेला आहे याचा अर्थ असा कि हा या गावाचा मुख्य व्यक्ती असून तो मृत झालेला असावा.
  • त्याच्या वरच्या रकान्यात लढाईचे चित्रण केले आहे. याचा अर्थ हा व्यक्ती या लढाईतील मुख्य लढवय्या असावा आणि त्याला लढाईत वीरमरण आले असावे.
  • तिसऱ्या रकान्यामध्ये एक पुरुष व तीन स्त्रीया अशा प्रतिमा कोरल्या आहेत यातील एक स्त्रीने त्या व्यक्तीचा हात हातात घेतला आहे आणि दुसरा हात वरती आभाळाकडे केलेला आहे. याचा अर्थ असा कि लढाईत वीरगती प्राप्त झालेल्या वीरास तीन अप्सरा स्वर्गात घेऊन चालल्या आहेत
  • सगळ्यात वरच्या रकान्यामध्ये शिवाची आराधना करणारा वीर व त्याच्याबरोबर पुजारी याचे चित्रण केले आहे. याचा अर्थ माणूस मृत्यू झाल्यानंतर तो कैलासवासी जातो असा होऊ शकतो.

बाकीच्या विरगळी वरील चित्र अस्पष्ट् दिसत आहेत त्यामुळे त्याचा अर्थ लावणे अवघड आहे.

 

विशेष आभार – इतिहासप्रेमी संतोष देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *